Saturday 25 February 2017

शुर सेनानी सेनापती संताजी घोरपडे यांच्या आयुष्यातील सुवर्ण पान

सेनापती संताजी घोरपडे यांच्या आयुष्यातील सुवर्ण पान.

इ स १६९४ मध्ये जिंजी ची परिस्थिती फारच नाजूक होती. यासाठी जिंजी च्या मदतीसाठी महाराष्ट्रातून धनाजी जाधव ससैन्य निघाला. हि बातमी समजताच संताजी सुद्धा हाताच सैन्य घेऊन त्या मागे रवाना झाला. यावेळी धनाजी ने वाटेत असलेल्या वेलूर किल्याचा जुल्फिकार खानाचा वेढा साधी लढाई करून उठवला आणि पुढं गेला. यांनंतर जुल्फिकार खान जिंजीच्या वेढ्यात जाऊन मिसळला. यांनंतर कर्नाटक मध्ये कासीमखान, खानाजादखान, सफशिकनखान वगैरे १०-१२ नामांकीत सेनापती आणि तिप्पट  मोगल सैन्याला कोंडून सोळा दिवस उपाशी मारल्याची वार्ता सर्वदूर पसरली आणि दक्षिण राजकारणात एकच खळबळ उडाली. याचा सविस्तर वृत्तांत बघू.

संताजी कर्नाटक मध्ये -
संताजी कर्नाटक मध्ये शिरल्या शिरल्या त्याने बेळगाव पासून ५२ मैलावर असणाऱ्या रामदुर्ग किल्ल्याला वेढा दिला. बादशाह संताजी च्या हालचालीवर खास लक्ष ठेऊन होता, त्याने तातडीने विजापूर चा सुभेदार नसुल्लाखान यास रामदुर्ग च्या मदतीला पाठवला आणि विजापूर -कर्नाटकचा फौजदार हिंमतखान बहाद्दूर याला संताजीच्या पाठलागावर पाठवलं. पण त्या आधीच संताजी रामदुर्ग सोडून दक्षिणेकडे गदगच्या दिशेनं निघाला होता. ९ नोव्हेंबर च एक संताजी च पत्र उपलब्ध आहे. इथल्या देशमुख-देशपांड्यांना लिहलेला सेनापतीचा तो एक जाहिरनामाच होता. पुढे संताजी कोप्पल च्या प्रदेशातून तुंगभद्रा ओलांडून चित्रदुर्ग परिसरात आला. चित्रदुर्ग चा बरमाप्पा नायक मोगली फौजाशी लढत होता. मराठा सैन्य येताच त्यानं त्यांचं स्वागत केलं आणि सारी हकिहत संताजी ला सांगितली. संताजी ने पूर्ण प्रदेशाची माहिती गोळा केली, कर्नाटकी हरकारे मराठा गुप्तहेरांना सहकार्य देत होते. संताजी ला स्थानिक लोकांच फार सहकार्य लाभलं. यावेळी भीमेकाठी बादशाहाची छावणी होती, त्याने संताजी च्या मागावर सरदार पाठवले कारण त्याला भीती होती की एकदा संताजी जिंजी पर्यँत पोहोचला तर मोगलांना खूप मोठा फटका बसणार होता. बादशाह ने सीऱ्याचा फौजदार कासीमखान याला कळविले " पाहिजे तेवढी सर्व मदत पाठवत आहे पण संताजीला कैद करा किंवा ठार मारा, ताबडतोब संताजीची वाट अडवावी, कोणतीही हयगय करू नये."
बादशाहने कासीमखानच्या मदतीसाठी बरेच मातब्बर सरदार पाठवले. ख्वाज़ाखान, खानाजादखान उर्फ रहुल्लाखान, सफाशीकनखान, सय्यद असालतखान, महंमद मुरादखान, मिर्झा हसन, खाफी महंमदखान यांच्या बरोबर बादशाही छावणीतील व बादशाहाच्या निकट खास असलेल्या खास निवडक चौकीतील निवडक मनसबदार, हप्त चुकीतून निवडलेले मुबलक सैन्य, भारी तोफखाना सोबत शाहजादा कामबक्ष आणि त्याची फौज सोबत होती. दक्षिणेतील आणि कर्नाटकातील सरदार हिमांतखान, हिमुद्दीनखान आणि रुस्तमदिलखान यांना हि सक्त हुकूम गेले होते. सर्वजण मिळून संताजी विरुद्ध मोहीम काढणार होते.

सर्व सरदार एकत्र आल्यावर मोहिमेला सुरवात झाली. कासीमखानचा मुख्य तळ सिरा असला तरी तो चित्रदुर्ग पासून १२५ मैलावर ईशान्येस अघोनी येथे डेरा देऊन बसला होता. त्याची ताकद दहा हजारापेक्षा जास्त खडी फौज, तोफखाना, सोने-चांदी, मोहिमेचे खाण्याचं साहित्य तो मुबलक बाळगून होता. या लढाईला मोगलांचे १०-१२ कसलेले व शूर सरदार-सेनापती आणि ४५ हजार सैन्य होते तर या उलट संताजी कडे सगळी मिळून १२ हजार फौज होती, यात सुद्धा २ हजार सटवाजी डफळे यांचे कर्नाटकी बरकांदार होते.

ठिकाण-
प्रत्यक्ष लढाई हि चलकेरे-तलाखु-दोड्डेरी या त्रिकोणात लढली गेली. मोगलांचे नियोजन असे होते की कासीमखान पहिल्या दिवशी चलकेरे तळावर येणार, दुसऱ्या दिवशी बादशाही सैन्य घेऊन तलाखु ला जाऊन मोहीम सुरू करणार आणि शेवट दोड्डेरी च्या किल्ल्यात मेजवानी घालून विजयोत्सव होणार. विशेष म्हणजे या मोगली सैन्यात एकही हिंदू सरदार नव्हता.

संताजी चा आत्मविश्वास आणि रणनिती-
तत्कालीन संताजी चा आभ्यास करता इतिहासकार म्हणतात की संताजी म्हणजे एक चालत-फिरत वादळ होत. त्याचा वेग आणि हालचाली पाहून मोगलांच्या प्रत्येक सरदाराला तो मध्येच गाठून एक-एक करून संपवू शकत होता. पण या प्रकारात त्याचा वेळ तर गेला असता पण सैन्य सुद्धा दमले असते. त्याचा भाव असा होता की सगळे सैन्य एकत्र करावे आणि एकदाच सगळ्यांची गठडी वळून त्यांचा ठोक किंवा घाऊक पराभव करावा. या साठी तो चित्रदुर्ग परिसरात सगळे मोगल एकत्र येण्याची वाट बघत होता. या वेळी एक गोष्ट जास्त लक्ष वेधून घेते कि ना संताजी ला कुठून मदत आली होती. ना कोणी मराठा सरदार मदतीला आला होता.
संताजी ची व्यूह रचना अशी होती की, चलकेरीपासून तो १५-२० मैल आला. मोगलांच्या तळांची खडानखडा बातमी काढत होता. आपल्या हालचालींची बातमी त्यांना पोहोचवत होता. हा गनिमी काव्याचा एक भाग होता. रोज ५-१० मैल जंगलात लांब जाऊ लागला. यामुळे मोगल सैन्य बेफिकीर झाले, त्यांना वाटलं की संताजी आपल्याला भिऊन जंगलात पळत आहे आपण त्याचा पाठलाग करून त्याला मारू शकतो. आणि एवढ्या मोठ्या सैन्यावर तो पलट वार करणार नाही याची खात्री झाली. जिवंतपणी मेलेल्याचे ढोंग करून संताजी ने मोगली सरदार आणि फौजांना गाफील केले आणि गनिमी काव्याची पहिली लढाई जिंकली.

लढाई -

संताजी च्या नियोजनानुसार सैन्याच्या ३ तुकड्या झाल्या. पहिले सैन्य पेशखान्यावर(जेवण-खाण करणारी लोक) हल्ला करेल. त्यांना वाचविण्यासाठी कासीमखान, खानजादखान वगैरे सरदार छावणी सोडून येतील. त्यांना दूर अंतरावर जंगलात लपलेल्या तुकडीने घेरून लढाई करायला भाग पाडायचं आणि एवढ्या वेळात तिसऱ्या तुकडीने छावणी लुटायची आणि पेटवून द्यायची. यात संताजी चे १२ ते १५ हजार सैन्य होते तर मोगलांचे ४५ हजार निवडक.

संताजी चे सैन्य मुख्य छावणी पासून २०-२५ मैलावर होते. भल्या पाहाटे मराठा सैन्य ठरल्याप्रमाणे छावणी जवळ आणि पेशखान्याजवळ येऊन थांबले. बाकीची दुसरी तुकडी चलकेरी व तलाखु रस्त्याच्या दोन्ही बाजूला जंगलात हल्ल्याची वाट बघत होते. आणि काही मुख्य अधिकारी, गोफणवाले, बंदूकधारी आणि बाणवाले उंचवट्याच्या जागांवर बसले होते. प्रत्येक टोळी बरोबर एक शिंगवाला इशाऱ्यासाठी ठेवण्यात आला होता.

ठरल्याप्रमाणे पहिल्या तुकडीने पेशखान्यावर हल्ला केला आणि पेंगुळलेलें सैन्य गारद केले. अर्धे मेले, काही जखमी झाले तर काही मुख्य छावणी कडे पळाले. मुख्य छावणी कडे जाणाऱ्या सैन्याला मराठयांनी अडवले नाही कारण हा संताजीच्या युद्धाचा एक भाग होता. बाजार-बुणगे व स्वयंपाक करणारे रानोमाळ पळत सुटले. मराठयांनी मोकळ्या पडलेल्या पेश खान्यावर यथेच्छ हात साफ केला. जेवढ खाण्यायोग्य होत तेवढं सामान जंगलात नेऊन लपवून ठेवलं आणि जे उपयोगी नव्हतं ते घोड्यांच्या पायाखाली तुडवल आणि तंबूला आग लावून दिली.
पळून गेलेल्या सैन्याने कासीमखान ला बातमी दिली आणि कासीमखान आपल्या सैन्यानिशी मराठयांवर चालून आला. पण मध्येच जंगलात दडून बसलेल्या सैन्याने कासीमखान वर दोन्ही बाजूने हल्ला केला. तोपर्यंत पेशंखान्यावरील मराठ्यांची तुकडी आपलं काम संपवून यांना मिळाली आणि एकच हल्ला केला. कासीमखानची भांबेरी उडाली. कासीमखान ने शाहनपणा करून काही घोडेस्वार छावणी कडे मदतीसाठी पाठविले त्यांना हि मराठ्यांनी अडविले नाही. कारण ही बातमी छावणी वर जावी आणि मुख्य छावणी वरील सगळे मोगल लढाईच्या मैदानात यावेत आणि छावणी मोकळी पाडावी हा संताजींचा डाव होता. आणि तसंच झालं.

शाही फौज कासीमखान च्या मदतीला-
कासीमखान घेरला गेलाय हे समजल्यावर शाही सरदार-पाहुणे सगळे आपापली फौज घेऊन कासीम खान च्या मदतीला आले आणि संताजीच्या वेढ्यात सापडले. मराठयांनी एकच बोंब केली. मोगलांनी प्रतिकाराचा जोर केला पण तो दिवस मराठ्यांचा होता आणि जोर सुद्धा मराठयांचा होता.
पौष शु।। एकादशीचा दिवस भल्या पहाटे पर्यंत भरपूर चंद्र प्रकाश होता. या प्रकाशात मराठे आपल्या जागा अश्या बदलत होते जस काय पूर्ण सूर्य डोक्यावर होता. सरस मराठे उंचवटे, झाड अंधारात सुद्धा झटापट बदलत होते. यामुळे मोगलांना नक्की काय प्रकार आहे आणि कुठून हल्ला होतोय हे समजत नव्हतं. मराठयांनी चंद्रप्रकाशात निम्मी लढाई मारली, मराठ्यांचा मारा ९९ टक्के मारक होता. भरपूर दगड जमा करून ठेवले होते. एकच गोफणवाला अनेक ठिकाणी मोर्चे बांधून मारा करत होता. मराठयांनी एकही मशाल वापरली नव्हती उलट मोगल मशाली घेऊन लढत होते यामुळे त्यांना मराठे दिसतच नव्हते. शेवटी मोगल जीव वाचविण्यासाठी पळत होते. याच गडबडीत तिसऱ्या टोळीने जाऊन मुख्य छावणी लुटली. सोने-चांदी-हिरे, जडजवाहीर, पैसा, धान्य, भांडी जेवढ शक्य तेवढं लुटलं.
कासीमखान तर पक्का उघडा पडला, पेशखान्याची छावणी आणि मुख्य छावणी दोन्ही बरबाद झाल्याचं पण मोगलांचा दारुगोळा हि मराठ्यांच्या हाती आला. आता मराठ्यांच्या सगळ्या तुकड्या मुख्य रणांगणावर आल्या आणि बेभान होऊन मोगलांवर तुटून पडल्या. मोकळ्या मैदानावर मोगलांना पळायला सुद्धा जागा शिल्लक ठेवली नाही. शेवटी दुसऱ्या दिवशी मराठयांनी मोगलांना कोंडण्याचा बेत आखला आणि त्यांना रेटीत दोन-अडीच मैल मागे दोड्डेरी च्या गढीत नेऊन कोंडले. मोगल तर पार संपून गेले होतेच पण त्यांचे मुख्य सरदार तर पळून गेले होते.
चित्रदुर्ग च्या बरमाप्पा नायकास कासीमखान ने खूप सतावले होते. त्यामुळे त्याने संताजीच्या मदतीला सूड उगविण्यासाठी मोहिमेच्या सातव्या आठव्या दिवशी ८ हजार कर्नाटकी सैन्य आणि बरकांदार खूप दारू-गोळ्यासह पाठवले. यामुळे मराठयांना आराम मिळाला आणि ताज्या दमाचे सैन्य मोगलांवर गोळीबार करू लागले. याचवेळी बादशाह ने कासीमखान च्या मदतीसाठी हिम्मतखान बहाद्दूर याला पाठविले. हिम्मतखान येत आहे असं समजताच संताजी ने मुख्य सरदारांना गढी भोवती ठेवून स्वतः मोजकी फौज घेऊन समाचाराला निघाला पण वाटेत त्याला समजलं की राजाराम महाराजांनी हिम्मतखानाचा परस्पर बंदोबस्त करून त्या पळवले व तो बसवापट्टणच्या गढीत जाऊन बसला. तेंव्हा संताजी पुन्हा मागे फिरला.( यावेळी धनाजी जिंजी किल्यातच होता. राजाराम महाराजांनी हिम्मतखानाचा बंदोबस्त केला हि गोष्ट राजाराम महाराज, संताजी आणि धनाजी यांच्या संबंधावर प्रकाश टाकण्यास फार महत्वाची आहे.)

नव्या दमाच्या कर्नाटकी सपट्यात ४-५ हजार मोगल ठार मेले. तेंव्हा मराठ्यांना दया आली आणि त्यांनी गोळीबार थांबवला. मैदानावर मोगलांवर लक्ष ठेवणे मराठयांना थोडं अवघड जात होत , मोगल गढीत सापडल्यान एकाच दरवाजावर लक्ष ठेवणे सोपं झालं.
गढीत फार वाईट अवस्था झाली. दोन दिवसात सगळं धान्य संपल, जनावरांचा चारा संपला. शेवटी मोगल दोरीने पिशव्या खाली सोडत आणि मराठे पैसे घेऊन त्यांना मूठ-मूठ धान्य देत होते. शेवटी पैसे हि संपले आणि मोगल एकामेकाच्या जीवावर उठले. हत्ती-गुर-उंट जे खाता येईल ते खाऊन दिवस काढू लागले. आपल्या सैन्याची दुर्दशा पाहून कासीमखानने विष खाऊन आत्महत्या केली.
शेवटी मोगलांच्या मोठ्या सरदारांनी एकत्र येऊन संताजीला शरण जाण्याची सूत्र हलवली आणि खानजादाखान चा दिवाण तहाचा प्रस्थाव घेऊन संताजी कडे गेला. तह संताजी जे म्हनेल तसा झाला.
' तुमच्याजवळ जे काही असेल, हत्ती-घोडे-उंट-हत्यारे-नगद याशिवाय सात लाख होन एवढी रक्कम घेईन. मग सोडीन ' अस म्हणून सरदारांच्या मुलांना ओलीस ठेऊन बाकीच्यांना सोडून दिले. गढीतून बाहेर येताना प्रत्येकाच्या हातावर २ भाकऱ्या आणि अरजन ची उसळ( हरभरा सारखे धान्य) दिले. सगळं मोगल सैन्य अधोनीच्या किल्ल्यात नेऊन सोडलं तिथे रुस्तुमदिल खान ने त्यांची व्यवस्था केली. १६ दिवस अंथरूण सोडाच पण साधी चादर पांघरायला नाही ते हि डिसेंबर च्या थंडीत.

खास बादशाहाच्या उमरावांना अशी वेळ यावी याशिवाय दुसरा अपमान कोणता असेल.? छत्रपतींच्या गनिमी काव्याने मोठं-मोठ्या मोगली फौजांना दाती तृण धारायला लावणारा संताजी कोणी साधारण सरदार नव्हता. नुसत्या संताजी च्या नावाने मोगली फौजा रस्ता वाकडा करायच्या किंवा मागे फिरायच्या. संताजी दक्षिणेत असे पर्यँत मोगलांनी मोहिमा रोखल्या होत्या. आज कर्नाटक मध्ये सुद्धा संताजींचा पराक्रम सांगितला जातो.

मोगल बातमीदार आणि इतिहास अभ्यासक म्हणतात की या लढाईत एकूण ७० लाखांची लूट मराठ्यांच्या हाती पडली होती.

चित्रदुर्ग भागात एक कानडी पोवाडा खूपच लोकप्रिय आहे. यामध्ये बरमाप्पा नायकाची लोकप्रियता सांगितली आहेत पण मराठयांनी केलेल्या मोगलांच्या हालाचे वर्णन मुद्देसूद केले आहे.

प्रवास वर्णन करणारे म्हणतात की , " शिवाजी महाराज यांनी गनिमीकावा शोधला असेल तर संताजी ने त्याचा जास्त वापर केला."

पराक्रमा तुझं दुसरं नावच संताजी

#रणमार्तंड मराठे

1 comment: