मराठेशाहीच्या अस्ताची कारणे.
मराठ्यांच्या राज्याचा उदय शिवरायांसारख्या कर्तृत्व व नेतृत्व या गुणांच्या संयोगाने सतराव्या शतकात झाला आणि हिंदुस्थानच्या राजकीय सत्तेवर नवा उदय झाला. त्यापूर्वी महाराष्ट्र आणि दक्षिण भागात सातवाहन, राष्ट्रकूट, शिलाहार, कदंब इ द्राविडवंशी सत्ता प्रमुख होत्या. देवगिरीचे राजे हे देखील दाक्षिणात्य साम्राज्य असल्यामुळे मराठयांना फार मोठ्या राजकीय परंपरेचा पाया नव्हता. या मुळे अनेक परदेशी इतिहासकार मराठ्यांच्या इतिहासाला लुटारूंचा इतिहास म्हणून संबोधतात. ग्रँड डफ सारख्याची फसगत झाली ती याच कारणांमुळे, तो म्हणतो, " मराठे म्हणजे सहयाद्री पर्वतातील अरण्यामध्ये वावटळी ने उडालेला पाचोळा ! तो एका ठिकाणी गोळा होऊन वणवा पेटला आणि लवकर शमलाही.." यातून एक गोष्ट अशी सिद्ध होते की मराठ्यांचे राज्य म्हणजे बंडखोर, लुटारु वृत्तीचा सामूहिक उद्रेक होता. पण जर अस असेल तर जवळ जवळ १६०० ते १८०० पर्यंत चा काळ हा काही कमी दिसत नाही.
मराठ्यांच्या राज्याच्या अस्ताची कारण अनेक इतिहासकार विविध अंगाने देतात. काहीजण ठराविक परिस्थिती, तर काहीजण ठराविक लोकांमुळे राज्य बुडाले अस म्हणतात.
कोणतेही राज्य फक्त पराक्रमाने उभे न राहता त्यात नैतिकता जास्त मारक असते. नैतिकतेअभावी उभी राहिलेली राज्य किती काळ टिकली याला इतिहास साक्ष आहे. फक्त हिंदुस्थानचा विचार केला तर हैदर, टिपू, अयोध्येचा नवाब, सुरजमल जाट इ. उदा आहेत. पण या अश्या सिद्धांताला आव्हान दिले ते न्यायमुर्ती रानडे यांनी. ते म्हणतात, ' जर खरच मराठ्यांचे राज्य बंडखोर, लुटारूंचे असते तर जितकी वर्ष टिकले, तितकेही टिकले नसते.' आणि असे त्यांनी ' Rise of Maratha Powar ' या संशोधनात लिहल आहे. रानडेंच्या मते मराठी सत्तेचा उदय हा शिवाजीच्या कल्पक, धडाडीच्या नेतृत्वाइतकाच महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थिती, हिंदुस्थानातील इतर प्रांतीयांच्या अंगी न आढळणारी मराठ्यांच्या स्वभावातील गुण हे जास्त प्रभावी ठरतात. हे गुण वैशिष्ठ मराठ्यांच्या अंगी एकदम निर्माण झालेले नव्हते. याला शिवाजीपूर्व काळातील परिस्थिती अवलंबून होती. आणि याच कारणांमुळे इतिहासातील चार मोठे आघात पचवून मराठी सत्ता पुन्हा उभी राहू शकली. पहिला आघात, १६६६ ला शिवरायांची कैद, १६८९ ला संभाजी राजे हत्या आणि औरंगजेब ससैन्य मोहिमा, १७६१ चा पानिपत पराभव आणि राघोबा-बारभाई यांच्या संघर्षातून झालेले पहिले मराठा-इंग्रज युद्ध.
पुढे न. ची. केळकर , ' मराठ्यांच्या प्रबळ मध्यवर्ती सत्तेचा अभाव, स्वतंत्र जहागिरीची आणि सरंजामांची मराठा सरदारत असलेली हाव, देशाभिमान, शिस्तबद्ध कवायती सैन्य आणि आधुनिक तोफा, बंदुका यांचा अभाव. ' हि कारणे देतात.
वि.का.राजवाडे यांनी मराठ्यांची पुराणप्रिय सनातनी वृत्ती व तिच्यामुळे मराठ्यांनी आधुनिक भौतिक शास्त्रांचा अभ्यास करण्यास केलेली टाळाटाळ हे मुख्य कारण सांगितले आहे.
सर युदुनाथ सरकार म्हणतात की, ' शिवाजी आणि पहिला बाजीराव यांनी मिळविलेल्या यशांमुळे सनातनी हिंदू मनोवृतीला अनुकूल प्रतिक्रिया घडून आली आणि तिने मराठेशाहीच्या मुळाला सुरुंग लावला. '
डॉ सुरेंद्रनाथ सेन आणि डॉ ताराचंद यांचे विचार जवळजवळ एकच आहेत, ' आपापसतील दुफळी हा मराठ्यांचा स्थायीभाव होता. समान शत्रूंविरुद्ध ते वाद विसरून एकत्र येतात पण संकट नाहीसे झाले की पुन्हा आपल्या स्वभावाला अनुसरून भांडायला सुरवात करतात. याच स्वभावाने ऐन वैभवाच्या काळात विनाशाची बीजे पेरली गेली. '
श्रीराम शर्मा यांच्या मतांनुसार पानिपत पराभव, राघोबा-इंग्रजांचे संबंध आणि १८०२ वसई चा तह हि करणे एक आहेत. उत्तरेतील मराठ्यांचा लुटारुपणामुळे उत्तरेत अनेक शत्रू निर्माण केले.
रियासतकार सरदेसाई यानी तर दुसरा बाजीराव पेशवा आणि दौलतराव शिंदे यांचा नाकर्तेपणा मराठेशाहीच्या अस्ताला कारणीभूत आहे असं सांगतात.
पाणीपतकार त्रं. शं.शेजवलकर म्हणतात की, ' मराठेशाहीचा अंत हा पेशव्यांच्या धोरणातील चुकांमुळे झाला. बाळाजी विश्वनाथ याने मुघल सत्तेच्या चौथ, सरदेशमुखीच्या सनदा आणून मुघल सत्तेची गुलाम गिरी स्वीकारली, पेशव्यांनी दुर्बल दक्षिण सोडून उत्तरेत मोहिमा काढल्या, आणि हिंदू तितुका मेळवावा हा मंत्र विसरून एकजूट होण्याचा आणि करण्याचा मंत्र ते विसरले.' हि कारणे ते मुख्यत्वे देतात.
या सागळ्याचा एकंदर विचार केला तर कोणताही संशोधक मराठ्यांच्या उदयातील काळाला जबाबदार धरत नाही. शिवाजी-संभाजी महाराजांचा काळ हा एका अंमलाखाली होता. पण पुढे गेल्यावर पेशवे अर्ध्याराज्याचे धनी झाले, विशेषतः पहिल्या बाजीरावानंतर. त्यात छत्रपती गादिच्या वाटण्या आणि सत्ता संघर्ष झाला यामुळे पेशवा पदाला जास्त मान मिळाला आणि पेशवा पुढे आला. महाराजांच्या काळात सुद्धा मोरोपंत पेशव्याच्या मनात पाल चुकचुकली होती तेंव्हा महाराजांनी त्यास घरी बसण्याचे योजले होते.
शाहू महाराजांच्या पश्चात पेशवे मराठा राज्याचे कर्ते-धर्ते झाले आणि बाजीरावानंतर एकही पेशवा पराक्रमी किंवा कर्तबगार निपजला नाही. सत्तेचा अहंकार चढला. मराठ्यांच्या अस्ताची कारण आर्थिक, राजकीय, लष्करी, सामाजिक या चारिबांजुचे झालेले खच्चीकरण हे आहे. एकट्या पेशव्याला संपूर्ण दोष देणं तस चुकीचंच आहे. पेशवा जरी चुकीचा होता असला तरी मराठेशाहीच्या रक्षणाची जबाबदारी इतर मराठा सरदार-जहागीरदार यांच्यावर सामान होती. मग ते कोणत्याही जातीचे असोत. पेशव्यांच्या धोरणांमुळे भलेही अनेक सरदार दुखावले असले तरी त्यांनी सार्वभौम ' मराठेशाही ' चा किंवा ' स्वराज्य ' चा विचार करणे गरजेचे होते. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीत अनेक अडचणी होत्या पण त्यांनी त्या मुत्सद्दीपणाने हाताळल्या. 3-3 पिढ्या पाहणारे मराठे त्यांच्या राज्याच्या समतोल राखू शकले नाहीत हि मराठ्यांच्या इतिहासातील खरी शोकांतिका आहे.
संदर्भ -
शिवकाल - वा सी बेंद्रे,
मराठ्यांचा इतिहास- अ रा कुलकर्णी व ग ह खरे
मराठेशाहीचे अंतरंग - डॉ जयसिंगराव पवार
पानिपत १७६१ - शेजवलकर
No comments:
Post a Comment