Monday, 28 May 2012

बाजी सर्जेराव जेधे

स्वराज्य उभारणीचा शहाजीराजांचा मनसुबा फसला आणि ते विजापूरच्या आदिलशाहची चाकरी करू लागले. बंगळुर हे शहाजीराजांचे जहागिरीचे ठिकाण. जिजाबाईसाहेब आणि शहाजीराजांनी बंगळुरात काही मसलत करून बालशिवबाला महाराष्ट्रात पुणे मुक्कामी पाठविण्याचे योजिले. शहाजीराजांनी बालशिवबाला आपले काही निष्ठावान सरदार, हत्ती, घोडे खजिना व भगवा झेंडा दिला. बालशिवबा जिजाबाईसाहेबांसमवेत बंगळुरहून पुण्याकडे निघाला.
पुण्याच्या कसबा गणपतीला वंदन करून आई तुळजाभवानीला साक्ष ठेवून बालशिवबाने मावळच्या दर्‍याखोर्‍यात स्वराज्याचा यज्ञ पेटविला! मुरुंबदेवाचा डोंगर (राजगड), तोरणा, कोंढाणा इ. समिधा यज्ञात पडल्या... आणि अलिआदिलशहाची झोप उडाली! प्रथम त्याने कपटाने शहाजीराजांना जिंजीजवळ पकडून अटकेत टाकले आणि आपल्या फत्तेखान नावाच्या सरदाराला प्रचंड फौजेनिशी स्वराज्यावर सोडले. सुभानमंगळ ताब्यात घेऊन फत्तेखान सासवडजवळील खळद-बेलसर या गावाजवळ तळ देऊन बसला. नुकतेच मिसरूड फुटलेले शिवाजीराजे पुरंदर किल्ल्यावरून युद्धाचे डावपेच आखू लागले. महाराजांच्या हुकमावरून मावळ्यांची एक तुकडी सुभानमंगळावर तुटून पडली. सुभानमंगळ फत्ते झाला. फत्तेखानाच्या सरदारांचा दारुण पराभव झाला. सुभानमंगळवर भगवा झेंडा फडकला! स्वराज्यासाठी लढती गेलेली ही पहिली लढाई! (8 ऑगस्ट 1648)

                       आत्ता पाळी होती फत्तेखानाची! पुरंदरावर जमलेल्या जिवलगांना महाराजांनी अपुला मनसुबा सांगितला. फत्तेखानाला गनिमी काव्याचा इंगा दाखवायचा. सगळ्यांनी आनंदानी माना डोलवल्या. पुरंदराहून फत्तेखानाच्या छावणीच्या दिशेने बिनीच्या तुकडीने कूच केले. तिच्यामागोमाग इतरही मावळे निघाले. सगळ्यात शेवटी निघाली भगव्या झेंड्याची तुकडी. या तुकडीत एका जवान मावळ्याच्या हाती भगवा झेंडा होता. या तुकडीत तगडे पन्नास-पंचावन्न आडदांड मावळे सामील झाले होते. पुरंदराहून हे वादळ फत्तेखानाच्या छावणीच्या रोखाने खळद-बेलसरकडे घोंघावत निघाले. भगवा झेंडा वार्‍यावर फडफडत होता!
मराठ्यांच्या तुकड्या बेलसरच्या परिसरात घुसल्या आणि इशारत होताच फत्तेखानाच्या छावणीवर तुटून पडल्या! खानाचे लष्कर लढाईस सज्ज झाले. भयंकर हाणामारी सुरू झाली. आपलं बळ कमी पडतंय हे जाणून मराठ्यांची बिनीची तुकडी हळूहळू काढता पाय घेऊ लागली. झेंड्याची तुकडी मात्र माघारी फिरली नव्हती. उलट त्या मर्दांनी शत्रूवर जोरदार हल्ला चढविला. खानाच्या सैन्याने झेंड्याच्या तुकडीला घेरले. गनिमांनी अगदी झेंड्यावरच गर्दी केली. झेंडा हेलकावू लागला. झेंडा पडला तर अब्रूच गेली. प्रत्येकजण झेंडा वाचविण्यासाठी शर्थ करू लागला. झेंडा धरलेल्या जवानाला गनिमांपैकी कोणाचा तरी इतक्या जोरात घाव बसला की तो स्वार घोड्यावरून खाली कोसळलाच. त्याच्या हातातला झेंडा निसटला. आता झेंडा जमिनीवर पडणार इतक्यात... एका तलवारबहाद्दराने झेंडा वरच्यावर पकडला. जखमीस्वाराला तशाच जलदगतीने दुसर्‍या एका घोड्यावर घेऊन झेंडा आपल्या हाती ठेवला आणि तुकडीला माघार घेण्याचा हुकूम केला. झेंडा हातात तोलीत त्या समशेरबहाद्दराने झेंड्याच्या तुकडीसह पुरंदराकडे कूच केले. झेंड्याभोवतीच्या गनिमांना कापून जमिनीवर पडणारा झेंडा हवेत वरचेवर झेलून मराठ्यांची अब्रू वाचवणार्‍या त्या समशेरबहाद्दराचे नाव होते बाजी जेधे! कान्होजी जेध्यांचा लेक!
प्रतापगड युद्धात मर्दुमकी गाजवणार्‍या कान्होजी जेंध्याचा पुत्र बाजी जेथे यास महाराजांनी त्याच्या अतुलनीय शौर्याबद्दल ‘सर्जेराव’ ही पदवी बहाल केली. बाजी जेध्यांचा झाला ‘बाजी सर्जेराव जेधे’! यानंतर पुरंदरच्या पायथ्याशी झालेल्या युद्धात फत्तेखानाचा दारुण पराभव झाला. महाराजांची अस्मानी फत्ते झाली! बाजी पासलकर, गोदाजी जगताप, भिकाजी चोर, कावजी, बाजी जेधे अशी मंडळी या युद्धात हिरीरीने लढली! (ऑगस्ट 1648) 
पुण्याहून दिवेघाटातून सासवडकडे जाताना दिवेघाट ओलांडला की खळद आणि बेलसर ही गावे लागतात. सासवडमध्ये बाजी पासलकर व गोदाजी जगताप यांची समाधीस्थाने आहेत.

गोदाजी जगताप

आत्ता कुठे स्वराज्य बहरू लागलं, आकार घेउ लागले होते. कुठल्याच पातशाहीचे त्यावर जास्त नजर नव्हती महाराज हळू हळू मुलुख वाढवत. संबध मावळातील लोक आपलेसे करत निघाले होते. अचानक महाराजांची अस्ते कदमांनी चालणारी कामे घोडदौडीत बदलली. स्वराज्याच्या कार्यास,श्रींच्या मनसुब्यास आई जगदंबेने भरघोस यश दिले आणि शहा पुत्र शिवाने सह्याद्रीवरी बंडाचा झेंडा उंचावला बघता बघता तोरणा , सुभानमंगळ, कोरीगड असे किल्ले सर करून पराक्रम गाजवले जाऊ लागले .
आणि शहाजीचा पोर मावळात आपली माणसे फोडतोय स्वतःचा मुलुख बनवतोय अशा खबरी आदिलशाही दरबारात येऊन थडकायला लागल्या. आणि त्या पहाडी चुह्याचा बंदोबस्त म्हणून फत्तेखानास शिवाजीवर धाडले फत्तेखान जेजुरी मार्गे चालून येत होता . नेसरी बेलसर जवळ त्याची छावणी पडली, तंबू ठोकले गेले . आणि नुकत्याच शिवाजीने जिंकलेल्या सुभानमंगळ या भुईकोटा वर आपले सैन्य धाडले वा तो किल्ला सर केला गेला.
तो किल्ला परत स्वराज्यात दाखल करून घेण्यासाठी महाराजांनी कावजी मल्हार यांना त्या भुईकोटावर धाडले. आणि त्यांनी गड काबीज केला ही पुरंदर मुक्कामी असताना महाराजांना समजली.
" किल्ला सर झाला आता या फत्तेखानास अजून एक तडाखा द्यायलाच हवा म्हणून महाराजांनी एक तुकडी तडक नेसरी गावावर धाडली. ह्या तुकडीचे प्रमुख होते बाजी पासलकर आणी त्यांसोबत कान्होजी जेधे, बाजी जेधे व गोदाजी जगताप


तशी खानची तुकडी बेसावधच होती. आत्ताच बाळसं धरलेल्या स्वराज्यावर चालून आलेली शिवाय ही पहिलीच मोहीम असल्याने मराठ्यांच्या काव्या विषयी काही माहीतच नसलेली रात्रीच्या अंधारात कुसं बदलत निपचित पडलेली खानाची छावणी. मराठ्यांनी डाव साधला


एकच कापाकापी सुरु झाली. कित्येक हश्मांनातर हत्त्यारे धरण्याची,उचलण्याची उसंत देखील मिळाली नव्हती पण तुकडी छोटीशी असल्याने मराठे जास्त काळ तग धरू शकणार नव्हते म्हणून तेथून काढता पाय घेतला व पुरंदर घाटला. ह्या वेळेस आदिलशाही सैन्य चाल करून येत होते गड चढत असतानाच गोदाजी , बाजी अशा सर्वानीच पराक्रमाची पराकाष्ठा केली चाल करून आलेल्या यवनांची कत्तल चालू होती.


ह्यातच गोदाजी व मुसेखानाचा एक खास सरदार मुसेखान हे एकमेकांच्या सामोरे झाले या दोघात तुंबळ युद्ध पेटले होते. वार प्रतिकार आघाडी पिछेहाट असे युद्ध चालू असताना गोदाजीच्या तलवारीने बरोबर मुसेखानाच्या छातडाचा वेध घेतला आणि मुसेखान कोसळला.

Friday, 25 May 2012

बाजी पासलकर

बाजी पासलकर हे मोसे मावळखोर्याचे वतनदार.निगडे मोसे गावापासून ते सांगरून-डावजेपासून,धामन-ओव्होळपर्यंतची ८४ खेडी त्यांच्या वतनदारीत होती.अत्यंत शूर असलेले बाजी न्यायदानातही उत्तम होते.तंटे सोडविण्यात ते हुशार होते.इतिहासात बाजी पासलकर नावाच्या दोन व्यक्ती होत्या.पहिले बाजी बेलसरच्या युध्दात मरण पावले तर दुसरे सवाई बाजी काय सावंताबरोबरच्या युध्दात मारले गेले.
             छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेस सुरूवात केली होती.शहाजीराजेंना पुणे जहागीर मिळाली होती.जिजाऊ आईसाहेब व शहाजीराजेंच्या मार्गदर्शनाखाली शिवबांनी मावळातील एक-एक किल्ला काबीज करावयास सुरूवात केली.तोरणा, सुभानमंगळ,रोहिडा असे किल्ले त्यांनी काबीज केले.विजापुरच्या अदिलशाही दरबारात शिवबांच्या स्वराज्य स्थापनेच्या खबरी येऊ लागल्या.शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी अदिलशाहने सन १६४८ साली फत्तेखानास धाडले.
         फत्तेखानाने जेजूरीजवळील बेलसर येथे आपला तळ ठोकला होता.खानाच्या सैन्याने शिरवळजवळील सुभानमंगळ किल्ल्यावर हल्ला करून किल्ला काबीज केला.मराठ्यांचा हा पहिलाच पराभव होता.छत्रपतींनी कावजी मल्हार यास सुभानमंगळ भूईकोटावर चालून जाण्यास सांगितले.त्यांनी एका रात्रीत गड सर केला.तर फत्तेखानावर हल्ला करण्यासाठी बाजी पासलकर,कान्होजी जेधे,बाजी जेधे,गोदाजी जगताप बेलसरच्या छावणीवर गेले,अचानक हल्ला करून त्यांनी खानाच्या सैन्याची कत्तल केली व पुरंदरचा पायथा गाठला.
                  फत्तेखानचा सरदार मुसेखानाने पुरंदरावर हल्ला केला,पुरंदराला खानाच्या सैन्याचा वेढा पडला.गडाजवळ फत्तेखानाच्या सैन्याचे व मराठ्यांचे तुंबळ युध्द झाले.बाजी पासलकर,कान्होजी जेधे,गोदाजी जगताप यांनी गनिमांची कत्तल केली.फत्तेखानचा सरदार मुसेखान व गोदाजी जगताप एकमेकाला भिडले.दोघात तुंबळ युध्द झाले.अखेरीस गोदाजीच्या वाराने मुसेखानाच्या छाताडाचा वेध घेतला व खान कोसळला.मराठ्यांनी स्वराज्याचा पहिला रणसंग्राम जिंकला पण बाजी पासलकर सारखा वीर रणी पडला.  त्याशी खासाखाशी गांठ पडली.एकास एकांनी पंचवीस जखमा करून ठार पडले.मग उभयतांकडील दळ आपले जागियास गेले.
                बाजी पासलकरांच्या बलिदानामुळे स्वराज्यातील मावळ्यांत सर्वस्वाचा त्याग करण्याचा आदर्श निर्माण झाला.पुण्याजवळील वरसगाव धरणातील जलाशयाला बाजी पासलकर यांचे नाव देण्यात आले आहे.पण दुर्दैव असे की याच धरणाच्या जलाशयात त्यांचा चिरेबंदी वाडा तसेच त्यांच्या वंशजांची शेकडो एकर जमीन बुडाली आहे,याचा मोबदला त्यांना शासनाकडून अजूनही मिळाला नाही.त्यांचे वंशज आजही त्यांच्या स्मृती जतन करण्याचे काम करत आहेत.

कान्होजी जेधे

कान्होजी जेधे आणि त्याचा पुत्र बाजी तथा सर्जेराव हे शिवकालातील जेधे घराण्यातील दोन कर्तबदार पुरूष होते.पुण्यापासून दक्षिणेस सुमारे पन्नास कि.मी.अंतरावर असलेल्या भोरजवळच्या कारी या गावचे देशमुख,कान्होजी जेधे होते.ही देशमुखी त्यांना अदिलशाहने दिली होती.शिवाजीराजेंच्या कारवायांनी त्रस्त झालेल्या अदिलशाहने फत्तेखान या सरदारामार्फत सन १६४८ साली शहाजीराजेंना अटक केली होती,तेव्हा कान्होजी व दादाजी लोहोकरे शहाजीराजेंसोबत होते.पुढे सर्वांची सुटका झाल्यावर शहाजीराजें  अदिलशाहाच्या हुकूमानुसार बंगळूर या आपल्या नव्या जहागीरीच्या ठिकाणी निघाले असता त्यांनी कान्होजींना शिवाजीराजेंकडे पाठविले. शहाजीराजें त्यांना बोलिले,”मावळप्रांती तुम्ही जबरदस्त आहा,राजश्री सिवाजी राजेपण आहेत.त्यांकडे जमेतीनिसी तुम्हास पाठवितो.   तेथे इमाने शेवा करावी कालकला(बिकट प्रसंगी)तरी जीवावरी श्रम करून त्यापुढे खस्त व्हावे(मरण पत्करावे)तुम्ही घरोबियातील मायेचे लोक आहा.तुमचा भरोसा मानून रवाना करतो(जेधे करीना)
              शहाजीराजेंचे हे बोल म्हणजे आज्ञा मानून कान्होजीं शिवाजीराजेंकडे आले आणि म्हणाले,”महाराजांनी(शहाजी)शफत घेऊन साहेबांचे शेवेसी पाठविले.तो इमान आपला खरा आहे.खासा व पाच जण लेक व आपला जमाव देखील साहेबापुढे खस्त होऊ.”(जेधे करीना) याच सुमारास सन १६४९ साली अफजलखानाने जावळीवर स्वारी करावयाचे ठरविले व अदिलशाहाच्या  वतनदारांना फर्मान धाडिले व आपणा सोबत येण्यास सांगितले.खानाच्या फर्मानास घाबरून केदारजी व खंडोजी खोपडे खानास मिळाले.फलटणचे निंबाळकर पूर्वीपासून  अदिलशाहसोबत होते.पण कान्होजीं जेधे आपले पाच पुत्रासह,सहकारी घेऊन राजापाशी आले आणि बोलिले,”यापुढे खस्त होऊ(मरण पत्करू) तेव्हा आमचे वतन कोण खावे आम्ही इमानास अंतर करणार नाही.”यानंतर राजेंचा निरोप घेऊन कान्होजीं कारी या आपल्या गावी आले,व मावळातील समस्त देशमुखांना बोलावून शिवरायांची मदत करावयास सांगितले.          
 कान्होजी समस्त देशमुखांना म्हटले,”अफजलखान बेईमान आहे.कार्य जालियावरी नस्ते निमित्य ठेऊन नाश करील हे मर्हाडष्ट राज्य आहे. अवघियांनी हिंमत धरून जमाव घेऊन राजश्री..स्वामी सांनिध राहोन येकनिष्ठेने शेवा करावी यैश्या हिमतीच्या गोष्टी सांगितल्या.”यावर सर्व देशमुखांनी राजेंकडे जाऊन आपले इमान व्यक्त केले.अडचणीच्या वेळी मावळातील सर्व देशमुखांना एकत्र करण्याचे काम कान्होजींनी करून राजांस मोठी मदत केली. प्रतापगडाच्या लढाईत कान्होंजीचा पुत्र बाजी याने जीव महालासोबत राहून महाराजांचे प्राण वाचविले तर खानाचा पाडाव झाल्यावर कान्होजी आपल्या सहकार्यांेसोबत खानाच्या सैन्यावर तुटून पडला व हत्ती, घोडा, नौबती, नगारे, बिशादी, खजाना मिळविला.शिवाजीराजेंनी सन १६५५-५६ साली जावळीच्या मोर्यांास शासन केले,त्यावेळी कान्होजी,बांदल,सिलिंबकर व इतर देशमुखांनी त्यांना सहकार्य केले.शाहित्येखानाविरूध्द लढण्यासाठी बाजी व चंदाजी हे कान्होजीचे दोन पुत्र राजेंसोबत लालमहालात गेले होते.राजें तोरणा,राजगडच्या बांधणीत  गुंतले असताना,विजापुरी सरदार फत्तेखान याने अचानक पुणे परिसरावर हल्ला केला.राजे तातडीने कान्होजीस पुरंदर किल्ल्यावर आले .मराठ्यांचे गनिमाबरोबर धारोंधर युध्द जाहाले,अनेक मावळे मृत्युमुखी पडले,पराभव झाल्यास मराठ्यांचा ध्वज शत्रुच्या हाती लागू नये म्हणून बाजीने काही गनिमास यमसदनास धाडून ध्वज घेऊन पुरंदरावर आला.तेव्हा राजे निशाण सांभाळून आणले म्हणोन खूष जाहाले व त्यास सर्जाराई असा किताब दिला.पुढे बाजी,सर्जेराव या नावाने ओळखू लागला. पुढे छत्रपती राजारामच्या कालखंडात सर्जेरावने आपल्या पित्याप्रमाणे कामगिरी करत औरंगजेबविरूध्द मावळातील देशमुखांना एकत्र केले.                                                                                                                                                     
स्वराज्यासाठी जेधे घराण्याने मोठे योगदान केले आहे.